गेल्या अकरा वर्षात भारताला इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. दमदार कामगिरी करत हा इतिहास बदलण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. पण ही लढाई तितकीशी सोपी असणार नाही. कारण इंग्लंडच्या भूमीवर भारताला आतापर्यंत मोठा संघर्ष करावा लागला आहे.
इतिहास काय सांगतो?
- भारताने इंग्लंडविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात खेळला.
- परदेशी भूमीवर भारताने आपला पहिलावहिला कसोटी सामना आणि कसोटी मालिका इंग्लंडमध्येच 1971 साली जिंकली. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडवर 1-0 असा विजय मिळवला होता.
- दिलीप वेंगसरकर यांनी 1986 साली लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात विश्वविक्रम केला. लॉर्ड्सवरील पहिल्याच कसोटीत तब्बल तीन शतकं झळकावण्याचा बहुमान वेंगसरकरांनी आपल्या नावावर केला. लॉर्ड्सवर अशी कामगिरी करणारे ते पहिलेच परदेशी खेळाडू ठरले. वेंगसरकर यांचा हा विक्रम आजपर्यंत अबाधित आहे.
- इंग्लंडविरुद्ध यजमान संघाविरुद्ध खेळलेल्या एकूण 17 कसोटी सामन्यांतील अवघे तीनच सामने जिंकण्यात भारताला यश आलं आहे.
- भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेसाठी 2007 साली झालेला इंग्लंड दौरा महत्त्वाचा ठरला होता. या दौऱ्यात कुंबळेने आपलं पहिलं कसोटी शतक साजरं केलं. आपल्या 118 व्या कसोटी सामन्यात कुंबळेने 110 धावांची नाबाद खेळी केली.
दरम्यान, आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत याची पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे. कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करुन संघात स्थान पक्क करण्याची पंतला ही चांगली संधी आहे.
संबंधित बातम्या
भारत अकरा वर्षानंतर इंग्लिश भूमीवर मालिका विजयासाठी सज्ज
विराटला कसोटीत अव्वल स्थानी झेप घेण्याची संधी
भारत कसोटी मालिका जिंकणार नाही, दोन भारतीय खेळाडूंची भविष्यवाणी