कोलंबो: मिताली राजच्या टीम इंडियानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली आणि महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. सुपर सिक्स फेरीतल्या आपल्या अखेरच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला सात विकेट्स आणि 165 चेंडू राखून लोळवलं.
कोलंबोच्या पी सारा ओव्हलवर झालेल्या सामन्यात एकता बिश्तच्या डावखुऱ्या फिरकी माऱ्यासमोर पाकिस्तानचा डाव 44व्या षटकात अवघ्या 67 धावांवरच कोसळला. एकतानं 10 षटकांत सात निर्धाव आणि अवघ्या आठ धावांच्या मोबदल्यात पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं आणि भारताच्या विजयाचा पाया घातला. एकताची ही एकदिवसीय क्रिकेटच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ठ कामगिरी ठरली.
त्याशिवाय शिखा पांडेनं दोन तर देविका वैद्य, दीप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौरनं प्रत्येकी एक विकेट काढली. मग हरमनप्रीतच्या 24 आणि दीप्ती शर्माच्या नाबाद 29 धावांच्या खेळींच्या जोरावर भारतानं विजयासाठीचं 68 धावांचं लक्ष्य आरामात पार केलं.
भारतीय महिलांना आता 21 फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला करायचा आहे. याआधी प्राथमिक साखळीत भारतानं दक्षिण आफ्रिकेला 49 धावांनी हरवलं होतं.
संबंधित बातम्या: भारतीय महिला संघाचं विश्वचषकाचं तिकीट कन्फर्म!