अँटिगा : टीम इंडियाच्या खेळाडूंनी अँटिगा कसोटीत दंडावर काळी पट्टी बांधून बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बीसीसीआयनंही ट्वीट करुन अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जेटली यांच्या परिवाराच्या दु:खात आम्हीही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असं बीसीसीआयनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. क्रिकेटप्रेमी असलेले जेटली हे बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष होते. तसंच आयपीएलच्या कार्यकारी मंडळाचेही ते माजी सदस्यही होते. दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना तिथल्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यात जेटली यांचा मोठा वाटा होता.


टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने देखील अरुण जेटलींना ट्वीट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. जेटली खूप चांगल्या मनाचे नेते होते. माझ्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी ते स्वतः माझ्या घरी आले होते. आपण एका चांगल्या व्यक्तीला गमावलं आहे, अशी प्रतिक्रिया विराटने दिली आहे.


विराटसोबतच माजी क्रिकेटर खासदार गौतम गंभीर, वीरेंद्र सहवाग यांनी देखील जेटलींना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, टीम इंडियाच्या भेदक आक्रमणासमोर अँटिगा कसोटीत वेस्ट इंडिजचा पहिला डाव 222 धावांत आटोपला. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 75 धावांची आघाडी मिळाली. विंडीजकडून रॉस्टन चेसनं सर्वाधिक 48 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार जेसन होल्डरनं 39 आणि हेटमायरनं 35 धावांची खेळी करुन विंडीजला दोनशेचा आकडा पार करुन दिला. टीम इंडियाच्या ईशांत शर्मानं सर्वाधिक पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजानं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.