अँटिगा : रवींद्र जाडेजाच्या झुंजार अर्धशतकामुळं विंडीज दौऱ्यातल्या अँटिगा कसोटीत टीम इंडियाला सर्व बाद 297 धावांची मजल मारता आली. जाडेजानं 112 चेंडूंत 58 धावांची खेळी करून भारतीय डावात मोलाची भूमिका  बजावली. त्याच्या या खेळीला सहा चौकार आणि एका षटकाराचा साज होता. जाडेजानं ईशांत शर्माच्या साथीनं आठव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली. त्याआधी या कसोटीत अजिंक्य रहाणेच्या झुंजार खेळीनं टीम इंडियाचा डाव सावरला. त्यानं दहा चौकारांसह 81 धावांची खेळी उभारली. रहाणेनं लोकेश राहुलच्या साथीनं 68 धावांची आणि हनुमा विहारीच्या साथीनं 82 धावांची भागीदारी रचली.


अजिंक्य रहाणेच्या खेळीमुळे भारताने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत पहिल्या कसोटीत चहापानापर्यंत आपलं वर्चस्व कायम राखलं होतं.   पहिल्या दिवसाअखेरीस ऋषभ पंत नाबाद 20 तर रविंद्र जाडेजा नाबाद तीन धावांवर खेळत होता.  ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशी केवळ चार धावांची भर घातली आणि तो बाद झाला.

यानंतर आलेल्या इशांत शर्माच्या साथीने जाडेजाने डाव सावरला. इशांतने 19 धावा करत त्याला चांगली साथ दिली. इशांत बाद झाल्यांनतर मोहम्मद शमी शून्यावर बाद झाला. त्यानंतर अर्धशतक केलेला जाडेजाही बाद झाल्याने टीम इंडियाचा डाव 297 धावांवर आटोपला.

वेस्ट इंडिजची सुरुवात देखील पहिल्या डावात चांगली राहिली नाही. ब्रेथवेट, कॅम्पबेल आणि ब्रूक्स लवकर बाद झाल्याने वेस्ट इंडिज टीमचा डाव गडगडला आहे. वेस्ट इंडिजने २५ षटकात  तीन बाद 78 धावा केल्या होत्या.