गयाना : विश्वचषकातल्या उपांत्य फेरीतल्या अपयशानंतर विराट कोहलीची टीम इंडिया 50-50 षटकांच्या फॉरमॅटसाठी सज्ज झाली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतला पहिला वन डे सामना आज सायंकाळी 7 वाजता गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवण्यात येईल. विश्वचषकादरम्यान दुखापतीमुळे बाहेर गेलेला शिखर धवन या सामन्यात पुन्हा वन डे पुनरागमन करेल. तर लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावरची जबाबदारी पार पाडेल. याशिवाय मनिष पांडे, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत या युवा खेळाडूंच्या कामगिरी महत्वाची ठरेल.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने तिसऱ्या टी20 सामन्यात विंडीजचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून मालिका 3-0 अशी जिंकली आहे. यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे.  भारताचा तिसरा सर्वोत्तम फलंदाज शिखर धवन सलामीला परतणार आहे. तर विश्वचषकात पाच शतके नोंदवणारा रोहित एकदिवसीय प्रकारातील सातत्य पुन्हा सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. धवन परतल्यामुळे लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकेल. केदार जाधव आणि ऋषभ पंत परिस्थितीनुसार पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल संघात परतणार असल्यामुळे भारतासाठी एकदिवसीय मालिकेतील आव्हान सोपे नसणार आहे. भारताविरुद्धची मायदेशातील मालिका खेळून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा गेलने विश्वचषकादरम्यान केली होती. त्यामुळे गेलची ही शेवटची एकदिवसीय मालिका असणार आहे.

गयानात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात विंडीजने टीम इंडियासमोर विजयासाठी 147 धावांचे आव्हान ठेवले होते. कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंतच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने हे आव्हान पाच चेंडू आणि सात विकेट्स राखून पार केले होते.