गुवाहाटी : गुवाहाटीमधील 2020 वर्षातील श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी-20 सामना पाऊस आणि खराब खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला होता. मात्र एकही चेंडू टाकण्याआधीच हा सामना रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. नाणेफेक झाल्यानंतर गुवाहाटीत पावसाला सुरुवात झाल्यामुळे सामना सुरु करण्यास विलंब झाला. काही वेळाने पाऊस थांबला मात्र मात्र खेळपट्टीवरचा काही भाग ओलसर होता. हा भाग सुकवण्यात अपयश आल्यामुळे अखेरीस पंचांनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.


या मालिकेसाठी टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. पण पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या जसप्रीत बुमराच्या पुनरागमनामुळे भारतीय गोलंदाजीची फळी मजबूत झाली आहे. या मालिकेतला दुसरा सामना इंदूर तर तिसरा सामना पुण्यात खेळवण्यात येईल. 2020 वर्षात भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही.

उभय संघात तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेतल्या या पहिल्या सामना आज होणार होता. टीम इंडिया आणि श्रीलंका दोन्ही संघ वर्षाची सुरुवात विजयी सलामीने करण्याचा प्रयत्न पावसामुळे फसला आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमरा, शिखर धवन यांच्यावर होती. सामन्याआधी दोन्ही संघांनी मैदानात जोरदार सराव केला होता.
संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.
श्रीलंका : लसिथ मलिंगा (कर्णधार), धनुष्का गुणतिलक, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, कुसल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डिसिल्व्हा, इसुरु उडाना, भानुका राजपक्षे, ओशदा फर्नांडो, वानिंदु हसरंगा, लाहिरु कुमारा, कुसल मेंडिस, लक्षण संदाकन आणि कसून राजिता.