गुवाहाटी : गुवाहाटीमधील 2020 वर्षातील श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी-20 सामना पाऊस आणि खराब खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला आहे. मात्र सामन्यात क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत बोर्ड असलेल्या बीबीसीआयची गरीबी दिसून आली. पावासमुळे ओलसर झालेला भाग सुकवण्यात अपयश आल्याने कालचा सामना रद्द करण्याची नामुष्की बीसीसीआयवर आली.


कालच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. नाणेफेक झाल्यानंतर गुवाहाटीत पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सामना सुरु करण्यास विलंब झाला. काही वेळाने पाऊस थांबला मात्र मात्र खेळपट्टीवरचा काही भाग ओलसर होता. हा भाग सुकवण्यात अपयश आल्यामुळे अखेरीस पंचांनी एकही चेंडू टाकण्याआधीच हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.


सामना सुरु करण्यासाठी ग्राऊंड स्टाफने प्रत्येक प्रयत्न करुन पाहिला. ओली झालेली पिच सुकवायची कशी असा प्रश्न सर्वांसमोर होता. मैदान आणि पिच सुकवण्यासाठी अद्ययावत मशिन्स मैदानात आणल्या जातीत, असा समज प्रेक्षकांना होता. मात्र तसं काही झालं नाही. उलट पिच सुकवण्यासाठी हेअर ड्रायर, इस्री, वॅक्युम क्लिनर अशा वस्तू मैदानात दिसत होत्या. त्यामुळे प्रेक्षकांची मात्र पुरती निराशा झाली.





गुवाहाटी येथील मैदानातील ते दृष्य भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील लाजिरवाणं दृष्य म्हणावं लागेल. एकीकडे बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. मात्र याच बीसीसीआयच्या अंतर्गत येणाऱ्या आसाम किकेट असोसिएशनकडे मैदान सुकवण्यासाठी योग्य ती सामग्री नाही, ही क्रिकेट प्रेमीसाठी निराशाजनक बाब आहे.