पुणे : मयांक अगरवाल, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी तीन बाद 273 धावांची मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विराट 63 तर रहाणे 18 धावांवर खेळत आहेत. सलामीचा रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर मयांक आणि पुजारानं टीम इंडियाच्या डावाला आकार दिला.


मयांक आणि पुजारा दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी रचली. मयांकने कारकीर्दीतलं दुसरं शतक झळकावताना 108 धावा केल्या. तर पुजाराने 58 धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने तीन फलंदाजांना माघारी धाडलं.


मयांक अगरवालने पुणे कसोटीत सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली. मयांकने पहिल्या विशाखापट्टणमच्या पहिल्या कसोटीतला फॉर्म कायम ठेवताना पुण्यातंही 108 धावांची दमदार खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 16 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.


विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावात मयांकनं द्विशतक झळकावलं होतं. 2009 नंतर पहिल्यांदाच एका भारतीय सलामीवीराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतकं ठोकण्याची पहिलीच वेळ ठरली आहे. याआधी वीरेंद्र सेहवागनं 2009 साली हा पराक्रम केला होता.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पुणे कसोटी विराट कोहलीसाठी कर्णधार या नात्याने 50 वी कसोटी ठरली आहे. 50 कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा विराट हा धोनीनंतर भारताचा दुसरा कर्णधार ठरला आहे. धोनीने ६० सामन्यांत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2014 साली कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर विराटने आतापर्यंत सर्वाधिक 29 कसोटीत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे.