केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारनं सातव्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयाच्या आशा जागवल्या होत्या. पण ते दोघंही लागोपाठच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला. भारताकडून रोहित शर्मानं सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झंपानं तीन तर पॅट कमिन्स, झे रिचर्डसन आणि मार्कस स्टॉयनिसनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
त्याआधी ऑस्ट्रेलियानं उस्मान ख्वाजाच्या शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांत 9 बाद 272 धावांची मजल मारली. ख्वाजानं 10 चौकार आणि दोन षटकारांसह 100 धावांची खेळी केली. त्याचं या मालिकेतलं हे दुसरं शतक ठरलं. ख्वाजानं अॅरॉन फिंच आणि पीटर हॅन्ड्सकॉम्बच्या साथीनं ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. पीटर हॅन्ड्सकॉम्बनं 52 धावांची खेळी उभारली. तर फिंचनं 27 धावांचं योगदान दिलं. भारताकडून भुवनेश्वर कुमारनं सर्वाधिक तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजानं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.