रांची : विराट कोहलीच्या झुंजार शतकानंतरही रांचीच्या तिसऱ्या वन डेत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियासमोर 314 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला सर्वबाद 281 धावांचीच मजल मारता आली.


टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं 123 धावांची खेळी करुन एकाकी झुंज दिली. पण विराट वगळता भारताच्या अन्य फलंदाजांना मोठी खेळी उभारता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झॅम्पानं सर्वाधिक तीन फलंदाजांना माघारी धाडलं.

त्याआधी ऑस्ट्रेलियानं कर्णधार अॅरॉन फिंच आणि उस्मान ख्वाजाच्या दमदार भागिदारीमुळे 50  षटकांत 5 बाद 313 धावांचा  डोंगर उभारला. सलामीच्या उस्मान ख्वाजानं वन डे कारकीर्दीतलं आपलं पहिलं शतक साजरं केलं. त्यानं 113 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकारासह 104 धावांची खेळी केली. तर कर्णधार फिंचनं 99 चेंडूत 10  चौकार आणि 3 षटकारांसह 93 धावा फटकावल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 193 धावांची भागीदारी रचून कांगारुंच्या डावाला मजबूती दिली. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं तीन चौकार आणि तीन षटकारांसह 31 चेंडूत 47 धावा कुटल्या. भारताकडून कुलदीप यादवनं तीन फलंदाजांना माघारी धाडलं तर मोहम्मद शमीनं एक विकेट घेतली.

रांची वन डेत टीम इंडियाला खराब क्षेत्ररक्षणाचा मोठा फटका बसला.सामन्याच्या व्या षटकात पॉईंटवर उभ्या असलेल्या शिखर धवननं शतकवीर उस्मान ख्वाजाचा सोपा झेल सोडला. तेव्हा ख्वाजा अवघ्या 17 धावांवर खेळत होता. या मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेत ख्वाजानं 104 धावांची खेळी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण डावादरम्यान भारतीय क्षेत्ररक्षकांनी गचाळ क्षेत्ररक्षण करुन कांगारुंना अनेक धावा बहाल केल्या.