India Tour Of Australia | टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी युएईवरून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. कोरोना साथीच्या काळात हा भारतीय संघाचा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे. यावेळी सर्व भारतीय खेळाडू खास पीपीई किटमध्ये दिसत होते. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी - 20 मालिका आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेचा पहिला सामना डे-नाईट खेळला जाईल. ऑस्ट्रेलिया गाठल्यानंतर भारतीय खेळाडू 14 दिवस क्वारंटाईन होणार आहे. या दौर्‍याची चांगली गोष्ट म्हणजे क्वारंटाईन असतानाही खेळाडू सराव करू शकतील. आयपीएल 2020 वेळी असं नव्हते.





भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा अद्याप भारतीय संघासह ऑस्ट्रेलियाकडे रवाना झालेला नाही. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) सराव करणार आहे. एकदिवसीय आणि टी -20 मालिकेत रोहितला विश्रांती देण्यात आली आहे. पण कसोटी मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याची सुरुवात 27 नोव्हेंबरला पहिल्या एकदिवसीय सामन्याने होईल. यानंतर तीन एकदिवसीय आणि तीन टी -20 आणि त्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.


Australia Tour | रोहित शर्माचा कसोटी संघात समावेश, तर विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार


कर्णधार विराट कोहली एकदिवसीय आणि टी -20 मालिका खेळल्यानंतर पहिल्या अॅटलेड कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. बीसीसीआयने विराटला पॅटर्निटी लिव्ह मंजूर केली आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे.





भारतीय संघाचा विकेटकीपर रिद्धिमान साहा हॅमस्ट्रिंगमुळे आयपीएल 2020 च्या शेवटच्या लीग सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. यानंतर दुसर्‍या क्वालिफायर सामन्यात दुखापतीमुळे त्याला बाहेर बसावे लागले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो खेळणार की नाही याबाबत नंतर निर्णय घेतला जाणार आहे. मात्र आता तो टीम इंडियासह ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.


भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यांचं वेळापत्रक 


एकदिवसीय सामने


पहिला सामना- 27 नोव्हेंबर (सकाळी 8 वाजता सुरु)
दुसरा सामना 29 नोव्हेंबर (सकाळी 8 वाजता सुरु)
तिसरा सामना- 2 डिसेंबर (सकाळी 8 वाजता सुरु)


ट्वेंटी-ट्वेंटी सामने

पहिला सामना - 4 डिसेंबर (दुपारी 12.30 वाजता सुरु)
दुसरा सामना- 6 डिसेंबर (दुपारी 12.30 वाजता सुरु)
तिसरा सामना - 8 डिसेंबर (दुपारी 12.30 वाजता सुरु)

कसोटी सामने

पहिला सामना- 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर (डे-नाईट सामना, सकाळी 8.30 वाजता सुरु)
दुसरा सामना- 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर (पहाटे 4.30 वाजता सुरु)
तिसरा कसोटी सामना- 7 जानेवारी ते 11 जानेवारी (पहाटे 4.30 वाजता सुरु)
चौथा सामना- 15 जानेवारी ते 19 जानेवारी (पहाटे 5 वाजता सुरु)