मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या कसोटीआधी दुखापतग्रस्त झालेला भारताचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ उर्वरित मालिकेत खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियातल्या चारदिवसीय सराव सामन्यात खेळताना त्याचा डावा घोटा दुखावला होता. त्यामुळे पृथ्वी शॉऐवजी भारतीय संघात सलामीच्या मयांक अगरवालचा समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीपर्यंत पृथ्वी शॉ पूर्णत: फिट होईल, असा विश्वास प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला होता. परंतु पृथ्वी अद्यापही दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे निवड समितीने उर्वरित सामन्यांसाठी पृथ्वीऐवजी मयांक अगरवालला संघात जागा दिली आहे.

मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरुवात होणार आहे. टीम इंडियासाठी दिलासादायक बाब म्हणजे बडोद्याचा अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीतून सावरला असून त्याच्या समावेशाने संघाची बाजू अधिक भक्कम झाली आहे.

याआधी 27 वर्षीय मयांक अगरवालची यावर्षीच मायदेशात खेळवलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवड झाली होती. परंतु त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी त्याला मिळाली नव्हती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या या फलंदाजाची पुन्हा एका राष्ट्रीय कसोटी संघात निवड झाली आहे. यावेळी मयांकला पदार्पणाची संधी मिळेल, अशी आशा आहे.

पृथ्वी शॉला दुखापत
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात सीमारेषेवर झेल घेण्याच्या प्रयत्नात पृथ्वी शॉला इजा झाली. पृथ्वी डीप-मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करत होता. त्याने सीमारेषेच्या आत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीरी मॅक्स ब्रायंटचा झेल टिपला. बॉल मैदानात फेकत असताना तो घसरला आणि त्याच्या घोट्याला इजा झाली. या दुखापतीमुळे त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावं लागलं होतं. आता उर्वरित मालिकेतही तो खेळू शकणार नाही.

संबंधित बातम्या

INDvsAUS : भारताला मोठा झटका; रोहित, अश्विन, पृथ्वी पर्थ कसोटीतून बाहेर

पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर

पृथ्वी शॉला गंभीर दुखापत, भारताची चिंता वाढली