मोहाली :  शिखर धवन आणि रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं मोहाली वन डेत नऊ बाद 358 धावांचा डोंगर उभारला. धवन आणि रोहितनं सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. धवननं दमदार फलंदाजी करताना करताना 143 धावांची खेळी उभारली. तर रोहित शर्माचं शतक अवघ्या पाच धावांनी हुकलं. रोहितनं 92 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह 95 धावा फटकावल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 193 धावांची भागीदारी रचली.

मोहाली वन डेत टीम इंडियाला दमदार सुरुवात करुन दिली.  धवन आणि रोहितनं सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन आक्रमणावर वर्चस्व गाजवलं. पहिल्या तिन्ही वन डेत अपयशी ठरलेल्या धवनला या सामन्यात सूर सापडला. त्यानं आपल्या कारकीर्दीतलं 28 वं अर्धशतक साजरं केलं.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला चौथी वन डे सामना आज मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर खेळवला जात आहे. पाच वन डे सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे मोहाली वन डे जिंकून मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन वन डे सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रांचीत खेळलेला सामना हा धोनीने भारतात खेळलेला अखेरचा सामना ठरु शकतो. कारण विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती घेण्याची शक्यता आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत मोहाली आणि दिल्लीत होणाऱ्या दोन वन डे सामन्यांमध्ये रिषभ पंतवर यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  धोनीसह वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही पायाच्या दुखापतीमुळे अखेरच्या दोन वन डेतून वगळण्यात आलं आहे. शमीच्या जागी भुवनेश्वर कुमारला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

विराट कोहलीच्या झुंजार शतकानंतरही रांचीच्या तिसऱ्या वन डेत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 314 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला सर्वबाद 281 धावांचीच मजल मारता आली होती.