मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. गल्लीतील लोक कलाकार आहेत, त्यांना लिहून दिलेल्या स्क्रिप्टवर ते अभिनय करतात. कालचं भाषण सुद्धा तसंच होतं. ते सुपारी घेऊन भाषण करतात, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुष्मा स्वराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.


राज ठाकरे यांनी काल (शुक्रवारी) मनसेच्या 13 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाजप सरकारवर निशाणा साधला होता. राजकीय फायद्यासाठी पुलवामा हल्ला घडवण्यात आला, निवडणूक जिंकण्यासाठी एक-दोन महिन्यात पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल, असा दावा राज ठाकरे यांनी केला होता.

VIDEO | भाजप महिला मेळाव्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संपूर्ण भाषण | UNCUT | एबीपी माझा

राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. राज ठाकरे जे बोलतात ती स्क्रिप्ट बारामतीतून लिहून येते. बारामतीला पोपटांची संख्या कमी झाली आहे. त्यांना आता पोपट मिळाला आहे. त्यांना जे बोलायला जमत नाही ते त्या पोपटाकडून बोलून घेतात, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

यांचा एकही आमदार, खासदार, नगरसेवक नाही. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे जास्त लक्ष देऊ नका. राज ठाकरे फक्त सुपारी घेऊन भाषणं करतात, म्हणून त्यांच्या भाषणाने विचलीत होऊ नका, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुर्यासारखे आहेत, त्यांच्यावर थुंकलं तर थुंकणाऱ्यांच्याच अंगावर पडेल, असं फडणवीस म्हणाले.

आशिष शेलार
हा ऐतिहासिक मेळावा आहे. याआधी इतक्या मोठ्या संख्येत एखाद्या मेळाव्यात महिला एकत्र आल्या नव्हत्या. हे कोणत्याही पक्षाला जमत नाही, असं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले. शेलार यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलायची तुमची लायकी नाही, अशा शब्दात आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर टीका केली. तुमच्या टीकेला आम्ही भीक घालत नाही. लोकसभेच्या एका जागेसाठी राज ठाकरे असलं राजकारण करत आहेत, असा आरोपही आशिष शेलार यांनी केला.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

देशातली आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी येत्या एक-दोन महिन्यात पुलवामासारखा हल्ला पुन्हा एकदा घडवला जाईल, असे भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे भाषण करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आले होते. राज यांनी जे आरोप केले, जे भाष्य केले, त्या प्रत्येक गोष्टीचे पुरावे सादर केले. राज यांनी प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून पुरावे सर्वांसमोर मांडले.

राज ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. राज म्हणाले की, "मोदी म्हणतात आपल्याकडे राफेल असतं तर खूप मदत झाली असती, असे म्हणून मोदींनी एअर स्ट्राईक करण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या आपल्या जवानांचा अपमान केला आहे. मोदी म्हणतात सीमेवरील जवानापेक्षा व्यापारी जास्त रिस्क घेतात, जवानांपेक्षा व्यापारी जास्त शूर असतात, असे बोलायला मोदींना लाज कशी नाही वाटली?" राज म्हणाले की, "एअर स्ट्राईकवेळी भारताकडे राफेल विमान असतं तर खूप फायदा झाला असता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, असं बोलून मोदी आपल्या जवानांच्या शौर्याचा अपमान करत आहेत. मोदी असं बोलून राफेल घोटाळा झाकू पाहत आहेत."

 UNCUT | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांचं भाषण | मुंबई | एबीपी माझा