टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला 323 धावांचं आव्हान दिलं आहे. रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीच्या प्रभावी आक्रमणानं कांगारूंना चौथ्या दिवसअखेर चार बाद 104 असं रोखलं आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अजूनही 219 धावांची गरज आहे, तर टीम इंडिया विजयापासून सहा विकेट्सनी दूर आहे. भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विननं ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमीनंही दोन विकेट्स घेत त्याला सुरेख साथ दिली. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शॉन मार्श 31 धावांवर, तर ट्रॅव्हिस हेड 11 धावांवर खेळत होता.
ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावाची सुरुवातही चांगली झाली नाही. सलामीवीर फिंचला 11 धावांवर अश्विनने बाद केले तर त्यांनतर आलेल्या ख्वाजाला अवघ्या 8 धावांवर अश्विननेच तंबूत धाडले. हॅरिसने 26 धावांची खेळी केली तर हॅन्डस्कॉम्ब 11 धावांवर बाद झाला. या दोघांनाही शमीने बाद केले.
त्याआधी पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या पुजारानं दुसऱ्या डावातही नऊ चौकारांसह 71 धावांचं योगदान दिलं. तर रहाणेनं सात चौकारांसह 70 धावांची खेळी उभारली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे टीम इंडियाला तीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायननं सर्वाधिक सहा फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्कनं तीन आणि जॉश हेजलवूडनं एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांत आटोपला होता. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडनं एकाकी झुंज देताना सहा चौकारांसह 72 धावांची महत्वपूर्ण खेळी उभारली होती. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 15 धावांचीच आघाडी घेता आली होती.
टीम इंडियाचा पहिला डाव 250 धावांत आटोपला होता. भारतातर्फे चेतेश्वर पुजाराने 123 धावांची खेळी केली होती. पहिल्या डावात पुजारा वगळता एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती.