लखनौ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरामधील हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांची हत्या झाली होती. या प्रकरणी सैन्यातील जवान जितेंद्र मलिकला काश्मीरमधून अटक केली आहे. सुबोध कुमार सिंह यांच्यावर जितेंद्रने गोळी झाडली, असा त्याच्यावर संशय आहे. सैन्यदलाने काल जितेंद्रला विशेष कार्य दलाच्या (एसटीएफ) ताब्यात दिले. सध्या त्याची चौकशी सुरु आहे.


एसटीएफची कारवाई

एसटीएफची टीम शनिवारी जम्मूत दाखल झाली. मध्यरात्री सैन्यानं जितेंद्रला पोलिसांच्या तब्यात दिले. जितेंद्रला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणी जितेंद्र मलिकने गोळी चालवली की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र तो तेथे उपस्थित होता, अशी त्याने कबूली दिली असल्याची माहिती एसटीएफचे प्रमुख अभिषेक सिंह यांनी दिली.

जितेंद्र हा जम्मूतील सोपोरामध्ये 22 राष्ट्रीय रायफल दलात कार्यरत आहे. तो 15 दिवसांच्या सुट्टीवर गावी आला होता. सोमवारी बुलंदशहरामध्ये हिंसाचार पेटला आणि त्यात पोलीस निरीक्षक सुबोधकुमार यांची जमावाकडून हत्या झाली. याप्रकरणात सुबोधकुमार यांची खाली पडलेली पिस्तूल घेऊन जितेंद्रने त्यांच्यावर गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय आहे.

जितेंद्रने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र घटनेच्या दिवशी जितेंद्र मुख्य आरोपी योगेश राज याच्यासोबत उभा होता. तसेच तो घोषणा देत असल्याचंही सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसत आहे. त्याच्या पत्नीने जितेंद्र हा घटनेच्या दिवशी बाहेरगावी खरेदीला गेला होता, असा दावा केला होता.

मुख्य आरोपी अद्यापही फरार

गोहत्येच्या संशयावरुन बुलंदशहरमध्ये हिंसाचार झाला होता. संतप्त जमावाने पोलीस चौकीवर हल्ला केला होता. यात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह आणि अन्य एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 9 जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी बजरंग दलचा प्रमुख योगेश राज याच्यावर हिंसा भडकवल्याचा आरोप आहे. मात्र तो अद्यापही फरार आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भाजयुमोच्या सदस्यांचा या प्रकरणात हात असल्याचं समोर आलं आहे. तसेच सैन्यातील जवान जितेंद्र मलिक याच्यासह आणखी एका निवृत सैनिकाचं नाव पुढे आलं आहे.

संबंधीत बातम्या

बुलंदशहर हिंसाचार : पोलीस अधिकाऱ्याची हत्या, बजरंग दलाचा सदस्य सूत्रधार