मेलबर्न : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 7 गडी आणि 4 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आहे. महेंद्रसिंग धोनीने भारताला हा सामना जिंकून दिला आहे. धोनीने 114 चेंडूत 87 धावा केल्या, तर त्याला केदार जाधवने 57 चेंडूत 61 धावा करत चांगली साथ दिली. त्याअगोदर कर्णधार विराट कोहलीने 62 चेंडूत 46 धावा करत चांगली सुरुवात करुन दिली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने भारताला दिलेले 231 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने सहज पार केले
दरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघावर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. भारतीय गोलंदाजांनी मेलबर्नच्या तिसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव 48.4 षटकात अवघ्या 230 धावांत गुंडाळला आहे. ऑस्ट्रेलियातर्फे पीटर हॅन्ड्सकॉम्ब याने सर्वाधिक 58 धावा केल्या.
231 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. भारतातर्फे महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक 87 धावा केल्या त्याला केदार जाधवने 61 धावा करत उत्तम साथ दिली.
मेलबर्नच्या वन डेवर आज सकाळपासून पावसाचे सावट होतं. त्यामुळे नाणेफेक जिंकताच भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय अचूक ठरवला. यजुवेंद्र चहलने 42 धावांत सहा फलंदाजांना माघारी धाडून ऑस्ट्रेलियाला गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. तर मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियामध्ये एकाच वनडे सामन्यात सहा विकेट्स घेणारा यजुवेंद्र चहल हा पहिलाच भारतीय फिरकीपटू ठरला आहे.
विराट कोहलीच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्याआधी भारताने तब्बल 71 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आहे. त्यानंतर झालेल्या दोन सामन्यांची टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली होती. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात इतकं मोठं यश मिळालं आहे.
माही इज बॅक
गेल्या काही महिन्यांपासून धोनी आऊट ऑफ फॉर्म होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीनही वन डे सामन्यांमध्ये धोनीने सलग तीन अर्धशतके झळकावली आहेत. दोन सामन्यांमध्ये त्याने मॅच विनिंग खेळी केली आहे. धोनीने सलग तीन अर्धशतकं करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
INDvsAUS 3rd ODI : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2019 04:22 PM (IST)
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 7 गडी आणि 4 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आहे. महेंद्रसिंग धोनीने भारताला सामना जिंकून दिला आहे. धोनीने 114 चेंडूत 87 धावा केल्या, तर त्याला केदार जाधवने 57 चेंडूत 61 धावा करत चांगली साथ दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -