लोक अगदी हौसेने, मजेने आणि खेळीमेळीने आपले आताचे आणि दहा वर्षापूर्वीचे फोटो फेसबुकवर शेअर करताहेत. पण मार्क झुकेरबर्गने ही टूम का आणली असावी, यातून त्याला काय साध्य करायचे आहे आणि याचा वापर कोण कसा करणार आहे याचा अभ्यासपूर्वक लेख अमेरिकेच्या सर्वाधिक खपाच्या 'द ऍटलांटीक' या नियतकालिकात प्रकाशित झालाय. याचे लेखक ऍलेक्सिस मॅड्रीगल हे सोशल मीडियाचे जागतिक अभ्यासक आहेत. लेख बराच मोठा आहे. त्यातले काही महत्वाचे बिंदू.


दोन्ही फोटो अपलोड करण्यात काही निगेटिव्ह पॉईंट आणि काही प्लस पॉईंटही आहेत.

निगेटिव्ह पॉईंटस -
फेसबुककडे युजर्सचा १५ बिलियन फेसव्हॅल्यू फोटोजचा डाटा आहे, त्यात अफाट वाढ होईल. या सर्व डाटाला ते एका फेस रिकग्निशन ऍप बनवणारया कंपनीला विकणार हे स्पष्ट.
फोटोच्या आधारे लोकांची राहणीमानातील आवडीनिवडीतील बदल, १० वर्षापूर्वीचे विविध भागातील ट्रेंड या आधारे येत्या दहा वर्षात कोणते ट्रेंड येऊ शकतात याचा डाटा बनवला जाईल आणि तो बहुत करून ऍमेझॉनसारख्या कंपनीला विकला जाईल.

मागील तीन वर्षात फेसबुकने घसरलेल्या विश्वसनियतेकडे फाट्यावर मारत केवळ अर्थार्जनासाठी युजर्सना कामाला लावले आहे त्याच वेळी युजर्सच्या फोटोंच्या सुरक्षिततेविषयी फेसबुक मूग गिळून गप्प आहे.

फेशियल रिकग्निशनच्या गुणसूत्रीय मांडणीस कोट्यवधी फोटो लागतात, त्याचा हा डाटाबेस होऊ शकतो. याच्या आधारे चेहरा ओळखण्याचे सॉफ्टवेअर विकणाऱ्या कंपनीस फोटो विकले जाणार. 'क्रॅनिओफेशियल लॉंजीट्युडीनल मॉर्फोलॉजिकल' फेस डाटाबेस बनवणारया MORPH या कंपनीसारखे क्लायंट फेसबुकसाठी फिट असू शकतात.

जगभरातील विविध भागातील व्यक्तीच्या १६ वर्षाच्या कालावधीतील फोटोंच्या आधारे संपूर्ण जगासाठीची बायोमेट्रिक सिक्युरिटी सिस्टीम बनवून ती विकण्याचे काही कंपन्यांच्या सुपीक डोक्यात घाटत आहे, त्यासाठी फेसबुक / इन्स्टाग्रामवरची ही मोहीम उत्कृष्ठ गळ ठरू शकते.

प्लस पॉईंटस -
लेखाच्या शेवटी ऍलेक्सिस म्हणतात की जर असे विरंगुळयाचे जुन्या आठवणींचे फोटो काढून कुणी काही क्षण आनंदी होत असेल तर त्याचा आनंद हिरावून घेण्याचा अधिकार इतरांना नाही, भले मग तो आनंद क्षणिक आणि फसवा असला तरी हरकत नाही.

आजवर अनेकदा आपण आपला डाटा चोरला जातो हे माहिती असूनही अनेक गोष्टी करतच आलो आहोत त्यात खंड पडला नाही, आता त्यात आपल्या जुन्या फोटोंची भर पडेल इतकेच. पण आपल्या फोटोंचे काय होणार आहे हे आपण कधीच सांगू शकणार नाही कारण या टेक्नॉलॉजीच्या हिमनगाचं टोकदेखील आपल्याला अजून उमंगलेलं नाही.

बाकी यामुळे नेटचा डाटा एकुणात मोठ्या प्रमाणात खर्ची पडेल ही गोष्ट आता गैरलागू ठरतेय कारण तो इतका स्वस्त आणि मुबलक झालाय की आपण थुंकी थुकावं इतक्या सहजतेने नेट वापरत आहोत. ही उपमा थोडीशी कठोर आहे पण सत्य आहे..

फेस रिकग्निशनच्या अभ्यासातून नेमके काय उपद्व्याप करता येतात या विषयीच्या एका प्रबंधाची लिंक - http://biometrics.cse.msu.edu//BestRowdenJain_Longitudinal…

'गो अहेड डू द स्टुपिड ऑफ युअरसेल्फ फ्रॉम टेन इयर्स ऍगो' - लेखक ऍलेक्सिस मॅड्रीगल. 'द ऍटलांटीक' या नियतकालिकात काल १६ जानेवारीस प्रकाशित झालेल्या या लेखाची लिंक- https://www.theatlantic.com/technology/archive/2019/01/go-ahead-do-10yearschallenge/580624/

फेस डाटाबेसचे प्रोजेक्ट प्रोव्हाईड करणारया मॉर्फची लिंक - http://www.faceaginggroup.com/morph/

वाढत्या वयाचे कोणते दुष्परिणाम असतात आणि त्यामुळे चेहरा कसा बदलतो ; त्या आधारे चेहऱ्याची ठेवण येत्या काही वर्षात कशी असू शकेल, मग त्यावर मात करण्यासाठी कोणत्या प्रकारची प्रसाधने येत्या दहा ते वीस वर्षात लागू शकतात, तसेच गुन्हेगारांची ओळख पटवताना चेहऱ्यांच्या ठेवणीत विविध कारणांनी होणाऱ्या बदलांची कोणकोणती कारणे असू शकतील, ते कसे दिसत असू शकतील याचा अंदाज बांधण्याच्या कामी मदतीस येणारे व चेहरयाच्या बदलातील घटक निश्चीतीची मीमांसा करणारे काही तक्ते वरती नोंद केलेल्या प्रबंधाच्या लिंक मध्ये आहेत.

टिप - इंस्टाग्रामवरून फेसबुकवर आलेल्या दशककालीन फोटो अभियानात ज्यांना सामील व्हायचे आहे त्यांचा हिरमोड करणे हा पोस्टचा हेतू नाही. ज्यांना व्यक्त व्हायचे आहे ते बिनधास्त व्यक्त होऊ शकतात. हे सगळे गौडबंगाल काय आहे याचा धांडोळा घेणारी माहिती लोकांपर्यंत पोहोचावी हा पोस्टचा हेतू आहे. बाकी सगळे ज्ञानी आणि सुज्ञ आहेत, जो तो आपल्या परीने समर्थ आहेच !