पर्थ : भारतीय वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांमध्ये आटोपला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताने सलामीच्या मुरली विजयची विकेट गमावून सहा धावांची मजल मारली आहे. मुरली विजयला भोपळाही फोडता आला नाही. मिशेल स्टार्कने त्याला माघारी धाडलं.

भारताच्या ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि उमेश यादवने आजच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. त्यामुळे कांगारुंना कालच्या धावसंख्येत केवळ 49 धावांचीच भर घालता आली. ईशांतने सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर बुमरा, उमेश यादव आणि हनुमा विहारीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.



पहिल्या दिवशी काय झालं?
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मार्कस हॅरिस, अॅरॉन फिन्च आणि ट्रॅव्हिस हेडने झळकावलेल्या अर्धशतकांनी पहिल्या दिवसअखेर 6 बाद 277 धावांची मजल मारुन दिली. ऑस्ट्रेलियाच्या हॅरिस आणि फिन्चने दिलेली 112 धावांची सलामी पहिल्या दिवसाच्या खेळाचं वैशिष्ट्य ठरली. याच भागिदारीने ऑस्ट्रेलियाला डावाचा भक्कम पाया रचून दिला. मग शॉन मार्श आणि ट्रॅव्हिस हेडने पाचव्या विकेटसाठी रचलेल्या 84 धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. हॅरिसने दहा चौकारांसह 70 धावांची, फिन्चने सहा चौकारांसह 50 धावांची, ट्रॅव्हिस हेडने सहा चौकारांसह 58 धावांची आणि शॉन मार्शने सहा चौकारांसह 45 धावांची खेळी उभारली.