अॅडलेड : ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि रवीचंद्रन अश्विन यांच्या प्रभावी आक्रमणानं अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवसअखेर सात बाद 191 असं रोखून धरलं. त्याआधी या कसोटीत भारताचा पहिला डाव आदल्या दिवशीच्या 250 धावांवरच आटोपला. त्यानंतर ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडून ऑस्ट्रेलियाला हादरवलं.
ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विननं 50 धावांत तीन विकेट्स काढून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला कलाटणी दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी टीम इंडियाच्या हाताशी 59 धावांची आघाडी शिल्लक होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटीत दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 2 बाद 57 धावांची मजल मारली होती. भारताकडे सध्या 59 धावांची आघाडी आहे.
ईशांत शर्माने पहिल्याच षटकात सलामीच्या अॅरॉन फिंचला माघारी धाडत कांगारुंना मोठा धक्का दिला. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्कुस हॅरीसने 45 धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अश्विनने हॅरीसला बाद करुन कांगारुंना दुसरा धक्का दिला.
त्याआधी आज टीम इंडियाचा पहिला डाव कालच्या धावसंख्येत एकही धावेची भर न घालता 250 धावांत आटोपला. भारतातर्फे चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 123 धावांची खेळी केली.