इंदूरः विराट कोहलीच्या टीम इंडियाने इंदूर कसोटीवरची पकड आणखी मजबूत केली आहे. या सामन्यात न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 28 धावांची मजल मारली असून, किवींची टीम भारतापेक्षा अजूनही 529 धावांनी पिछाडीवर आहे.


दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा टॉम लॅथम सहा धावांवर तर मार्टिन गप्टिल 17 धावांवर खेळत होता. त्याआधी भारताने पहिला डाव 5 बाद 557 धावांवर घोषित केला. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 365 धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताला ही मजल मारता आली.

कोहलीचं विक्रमी द्विशतक

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इंदूर कसोटीत द्विशतक झळकावून दोन नवे विक्रम रचले. विराटने 366 चेंडूंत वीस चौकारासंह 211 धावांची खेळी उभारली. कर्णधार या नात्याने दोन द्विशतकं झळकावणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला.

विराटने जुलै महिन्यातच वेस्ट इंडिजमध्ये 200 धावांची खेळी रचली होती. इंदूरमध्ये विराटने अजिंक्य रहाणेसह चौथ्या विकेटसाठी 365 धावांची भागीदारीही रचली. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या विकेटसाठीची ही सातवी सर्वोत्तम भागीदारी ठरली.

विराट-अजिंक्यने सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मणचा भारताकडून चौथ्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीचा विक्रमही मोडला. सचिन-लक्ष्मणने 2004 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत चौथ्या विकेटसाठी 353 धावांची भागीदारी रचली होती.