जकार्ता : भारताच्या किदंबी श्रीकांतनं इंडोनेशिया सुपर सीरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीकांतनं जपानच्या काझुमासा साकाईचा पराभव केला.


किदंबी श्रीकांतने 21-11, 21-19 असा दोन गेम्समध्ये विजय मिळवला. त्यानं साकाईला अवघ्या 37 मिनिटांमध्ये गाशा गुंडाळायला लावला. चोवीस वर्षांचा श्रीकांत जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानावर आहे. त्याचं सुपर सीरीजमधलं हे दुसरं विजेतेपद ठरलं.

श्रीकांतनं याआधी 2014 साली चायना ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. सुपर सीरीजच्या इतिहासात श्रीकांतनं फायनल गाठण्याची ही चौथी वेळ होती. त्यानं एप्रिल महिन्यात सिंगापूर ओपनची फायनल गाठली होती. 2015 साली श्रीकांतनं इंडिया ओपन जिंकण्याचा मान मिळवला होता.