जकार्ता : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला जाकार्तामधल्या इंडोनेशिया ओपनच्या महिला एकेरीत अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या अकाने यामागुचीने सिंधूचा 21-15, 21-16 असा पराभव केला.


आजच्या सामन्यात सिंधू यामागुचीच्या जबरदस्त खेळापुढे टिकू शकली नाही. सिंधू आणि यामागुची याआधी 14 वेळा आमनेसामने आल्या होत्या. 14 पैकी 10 सामन्यात सिंधूने यामागुचीचा पराभव केला होता. त्यामुळे सामन्याआधी सिंधूचं पारडं जड वाटत होतं. हा सामना सिंधू सहज जिंकेल, असा विश्वास तिच्या चाहत्यांना होता. परंतु यामागुचीने सर्वांची स्वप्न भंग केली.

यामागुचीने सिंधूला अवघ्या 51 मिनिटांत गाशा गुंडाळायला लावला. सिंधूने डिसेंबर महिन्यात वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर यंदाच्या मोसमात सिंधूला एकाही विजेतेपदावर आपलं नाव कोरता आलेलं नाही. तिला यंदा सिंगापूर आणि इंडिया ओपनच्या उपांत्य फेरीत हार स्वीकारावी लागली होती.

रिओ ऑलिम्पिकमधल्या रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने काल झालेल्या उपांत्य सामन्यात चीनच्या शेन युफीचा 21-19, 21-10 असा धुव्वा उडवून, इंडोनेशिया ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.