मुंबई : गेल्या वर्षभरापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. लोकसभा निवडणूक काळात भाजपने विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर विरोधी पक्षातून जोरदार टीका सुरु आहे. तर बाहेरच्या नेत्यांच्या इनकमिंगमुळे भारतीय जनता पक्षातले अनेक नेते, कार्यकर्ते नाराज असल्याचीदेखील चर्चा आहे.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांनी पक्षातल्या इनकमिंगबाबत भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या पक्षांमध्ये अनेक चांगले नेते आहेत. त्यांच्यातील निवडक मंडळी पक्षात घ्यावी लागतात. अशा नेत्यांना आम्ही पक्षात घेतो, म्हणून कोणीही वाईट वाटून घेऊ नये.

मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही तर पब्लिक अनलिमिटेड पार्टी आहे. त्यामुळे चांगल्या नेत्यांना आपण आपल्या पक्षात प्रवेश देतो. जो भाजपमध्ये आला तो भाजपचा झाला, नाहीतर राजकारणातून कायमचा हद्दपार झाला.

व्हिडीओ पाहा



फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पक्षात येऊ पाहणाऱ्या नेत्यांना पक्षात घ्यावेच लागेल. अर्थात आम्ही थोडं तपासून घेऊ. 15 टक्के लोक आपण इतर पक्षातून घेतो, त्यामुळे आपल्या पक्षातील लोकांनी डिस्टर्ब होण्याचे कारण नाही.

फडणवीस यांनी सांगितले की, कोणत्याही नेत्याला उमेदवारी देताना निकष ठरलेले आहेत. मतदारसंघाच्या सर्वेक्षणाच्या अभ्यासातून निर्णय घेतले जातात. उमेदवारी मिळवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना कोणीही निवेदने देऊ नका. निवेदनांमुळे आपल्याकडे उमेदवारी मिळत नाही. जो योग्य असेल, आपण त्यालाच तिकीट देतो.