गयाना: हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघानं महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी धुव्वा उडवला. भारतीय महिलांचा हा ब गटातला सलग चौथा विजय ठरला. भारतानं चारही साखळी सामने जिंकून ब गटात अव्वल स्थान राखलं.

भारतीय महिलांनी अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६८ धावांचं आव्हान दिलं होतं. भारताच्या फिरकी चौकडीनं ऑस्ट्रेलियाला विसाव्या षटकांत नऊ बाद ११९ असं रोखलं.

भारताकडून कोल्हापूरच्या अनुजा पाटीलनं १५ धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. दीप्ती शर्मा, राधा यादव आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंडपैकी एका संघाशी होईल.

त्याआधी, या सामन्यात भारतानं वीस षटकांत आठ बाद १६७ धावांची मजल मारली. सलामीची स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरनं तिसऱ्या विकेटसाठी रचलेली ६८ धावांची भागीदारी मोलाची ठरली. त्यात हरमनप्रीतचा वाटा २७ चेंडूंत ४३ धावांचा होता. तिनं तीन चौकार आणि तीन षटकारांनी ही खेळी सजवली. महाराष्ट्राच्या स्मृती मानधनानं दुसरी खिंड लढवली. तिनं ५५ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह ८३ धावांची खेळी उभारली.