मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत पुन्हा नंबर वनवर झेप घेतली आहे. भारतीय कर्णधाराने बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत झळकावलेल्या शतकाने त्याला कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मानाचं स्थान पुन्हा मिळवून दिलं आहे.


विराट कोहलीच्या खात्यात आता 928 रेटिंग गुण आहेत, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या स्टीव्ह स्मिथच्या खात्यात 923 रेटिंग गुण आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये स्मिथला मोठ्या धावांची खेळी करता आली नाही. त्यामुळे त्याची नंबर एकवरुन दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपल्या आहेत. त्यानंतर आज आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली. पहिल्या दहा फलंदाजांमध्ये एकट्या ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज आहेत. तरत या यादीत भारताच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे. विराट व्यतिरिक्त चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर आणि भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सहाव्या क्रमांकावर आहे.

आयसीसीने जारी केलेल्या मागील क्रमवारीत अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर होता. परंतु यावेळी त्याला एका स्थानाचा फटका बसला आहे. दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध अॅडलेड येथे खेळवण्यात आलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात नाबाद तिहेरी शतक झळकावणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने 17 व्या स्थानावरुन थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या केन विलयम्सनने त्याचे तिसरे स्थान कायम राखले आहे.

फलंदाजांची क्रमवारी आणि गुण
विराट कोहली - 928
स्टिव स्मिथ - 923
केन विल्यमसन - 877
चेतेश्वर पुजारा - 791
डेव्हिड वॉर्नर - 764
अजिंक्य रहाणे - 759
ज्यो रूट - 752
मार्नस लॅब्यूशाने - 731
हेन्री निकोलस - 726