दुबई : भारताचा स्टार अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनची 2016 च्या आयसीसी सर्वोत्तम क्रिकेटर आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटर म्हणून निवड झाली आहे. अश्विनने आयसीसीच्या सर्वोत्तम क्रिकेटरसाठीच्या सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.


क्रिकेटच्या विश्वात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचा दरवर्षी आयसीसी पुरस्कारांनी सन्मान केला जातो. यंदा 14 सप्टेंबर 2015 ते 20 सप्टेंबर 2016 या कालावधीतील कामगिरीच्या आधारे हे पुरस्कार देण्यात आले आहेत. अश्विनने या कालावधीत आठ कसोटी सामन्यांत तब्बल 48 विकेट्स काढल्या आहेत शिवाय 42च्या सरासरीने 336 धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये अश्विन सध्या गोलंदाजांच्या आणि अष्टपैलूंच्या क्रमावारीतही अव्वल स्थानावर आहे. त्यामुळेच आयसीसीच्या सर्वोत्तम क्रिकेटर पुरस्काराचा मान अश्विनला मिळाला आहे.

याच कालावधीत अश्विनने तीन वन डे सामन्यांत तीन आणि 19 ट्वेन्टी-20 सामन्यांत 27 विकेट्स काढून सर्वोत्तम क्रिकेटर पुरस्काराचा मान मिळवला.