लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सेमीफायनल बुधवारी कार्डीफच्या मैदानावर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र या सामन्याचे 38 टक्के तिकिटं भारतीय प्रेक्षकांनी खरेदी केली आहेत.


पहिल्या सेमीफायनलचे सर्व तिकिटं अगोदरच बूक करण्यात आली आहेत. यापैकी एक तृतीयांश तिकिटं भारतीय प्रेक्षकांनी खरेदी केली आहेत, अशी माहिती गलीमोरगन क्रिकेट क्लबच्या (जीसीसी) अधिकाऱ्याने दिली आहे.

जीसीसीला या सामन्याचं आयोजन करण्यास सांगितलं तेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीत कोणता संघ सहभाग घेणार आहे, याची काहीही माहिती नव्हती. मात्र दोन महिन्यांपूर्वीच या सामन्याची सर्व तिकिटं बूक झाली आहेत आणि यामध्ये 38 टक्के भारतीय प्रेक्षक आहेत, अशी माहिती जीसीसीचे अधिकारी हेयो मॉरिस यांनी दिली.

भारतानेही सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. मात्र भारताचा सामना बांगलादेशशी 15 जूनला बर्मिंगहॅममध्ये होणार आहे.

... तर तिकिटं परत करा : जीसीसी

भारताचे जे प्रेक्षक कार्डीफच्या मैदानावर हा सामना पाहण्यासाठी येणार नाहीत, त्यांनी तिकिटं आयसीसीच्या वेबसाईटवर मूळ किंमतीत परत करावीत, जेणेकरुन इंग्लंड आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना ती तिकिटं घेता येतील, असं आवाहन हेयो मॉरिस यांनी केलं आहे.

दुसरीकडे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने सामना पाहण्यासाठी प्रेक्षक येत नसल्याने टीका केली आहे. कार्डीफवरच प्रेक्षक येत नाहीत, असं म्हणत व्यवस्थापनावर वॉनने टीका केली.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका या सामन्याला केवळ 10 हजार 800 प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.

कार्डीफमध्ये झालेल्या सर्व सामन्यांच्या सर्व तिकिटांची विक्री झाली होती. मात्र तिकिटं खरेदी करुनही प्रेक्षक का येत नाहीत, याचा शोध घेणं गरजेचं आहे. कदाचित खराब हवामानामुळे प्रेक्षक येत नसतील, असं हयो मॉरिस यांनी म्हटलं आहे.