दुबई : कबड्डी मास्टर्सच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. पाकिस्तानचा 36-20 असा पराभव करत भारतीय संघाने सहा देशांमध्ये सुरु असलेल्या ‘कबड्डी मास्टर्स 2018’ ची दमदार सुरुवात केली आहे.


सामना सुरु होताच भारतीय संघाने यशस्वी रेड्स करत पाकिस्तानच्या संघावर जोरदार आक्रमण केले. अजय ठाकूरने कर्णधारपदास साजेशा खेळ करत भारतासाठी 8 गुण मिळवले. दुसरीकडे पाकस्तानी संघ मात्र हतबल दिसत होता. भारताने रेड्सद्वारे 15 गुण कमावले तर पाकिस्तानी रेड्सर्सना अवघे 9 गुण कमावता आले.

भारताच्या मजबूत डिफेन्सचेही पाकिस्तानकडे उत्तर नव्हते. परिणामी पाकिस्तानी संघाला भारतीय संघाकडून दारूण पराभव सहन करावा लागला.
विश्वचषक विजेता भारतीय संघ या ‘कबड्डी मास्टर्स 2018’ मध्ये जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

ट्विटरवरुन सेहवागने केले अभिनंदन
वीरेंद्र सेहवाग ट्विटरवर आपल्या धडाकेबाज ट्विट्सने कायम चर्चेत असतो. आताही सेहवागने एक ट्विट करत म्हटलं, “ कबड्डी मास्टर्समध्ये भारताने मिळवलेल्या विजयाबद्दल अभिनंदन,सामना बघायला मजा आली.”


दुसरीकडे, सेहवागच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतीस्पर्धी देशांचे चाहते एकमेकांना भिडले आहेत.