मुंबई : ‘सैराट’चा हिंदी रिमेक असलेला जान्हवी कपूर आणि इशान खट्टरच्या ‘धडक’ सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. ट्विटरवर आपल्या क्रिएटिव्हिटीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांनी याच सिनेमातील एक डॉयलॉग वापरत ट्रॅफिक सिग्नलबाबत जागरुकता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.


मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर एक मीम शेअर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये ‘धडक’ सिनेमातील एका डायलॉग आहे, पण जान्हवी कपूरच्या जागी ट्रॅफिक सिग्नलचा फोटो आहे. धडकच्या ट्रेलरमध्ये एक सीन आहे, ज्यामध्ये जान्हवी कपूर इशान खट्टरला म्हणते, “क्या नाटक कर रहा है, मुझे देख क्यो नहीं रहा ?” या डॉयलॉगचा वाहनचालकांमध्ये ट्रॅफिक सिग्नलबाबत जागरूकता पसरवण्यासाठी खुबीने वापर केला आहे.

ट्विटरवर हे मीम शेअर करताना फोटोसोबत एक कॅप्शनही देण्यात आलं आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे, “ट्रॅफिक सिग्नलच्या भावनिक अंगाकडे दुर्लक्ष करू नका. ट्रॅफिक सिग्नल पाळणं गरजेचं आहे.”


सोशल मीडियावर या ट्विटची मोठी चर्चा झाल्यानंतर आता जान्हवी कपूर आणि इशान खट्टरनेही या मीमचा फोटो आपल्या इंस्टावर पोस्ट केला आहे. या दोघांची प्रमुख भूमिका असणारा ‘धडक’ 20 जुलैला रिलीज होतोय.



दरम्यान, काही दिवसांपासून मुंबई पोलिसांनी ट्रॅफिकबाबत जागरूकता पसरवण्यासाठी ट्विटरवर शेअर केलेले अनेक फोटो सोशल मीडियावर पसंत केले जात आहेत.