मोहाली : रोहित शर्माच्या टीम इंडियानं मोहालीत श्रीलंकेचा 141 धावांनी धुव्वा उडवून धरमशालातल्या पराभवाची सव्याज परतफेड केली. भारतानं या विजयासह तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. कर्णधार रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीत झळकावलेलं तिसरं द्विशतक टीम इंडियाच्या या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं.


या सामन्यात भारतीय संघानं श्रीलंकेला विजयासाठी 393 धावांचं आव्हान दिलं होतं. पण श्रीलंकेला 50 षटकांत आठ बाद 251 धावांचीच मजल मारता आली. श्रीलंकेच्या अँजलो मॅथ्यूजनं शतक झळकावून दिलेली झुंज एकाकी ठरली.

रोहितचं बायकोला द्विशतकाचं अॅनिव्हर्सरी गिफ्ट!

त्याआधी, कर्णधार रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं तिसरं द्विशतक ठोकून, टीम इंडियाला मोहालीत 50 षटकांत चार बाद 392 धावांचा डोंगर उभारून दिला. या सामन्यात रोहितनं कर्णधारास साजेशी खेळी उभारली. सलामीला फलंदाजीला उतरलेला रोहित पन्नासाव्या षटकाअखेर नाबाद राहूनच ड्रेसिंगरूममध्ये परतला.

वन डेतलं तिसरं द्विशतक रोहितसाठी लाखमोलाचं

त्या अवधीत रोहितनं 153 चेंडूंत 13 चौकार आणि 12 षटकारांसह नाबाद 208 धावांची खेळी उभारली. त्यानं शिखर धवनच्या साथीनं 115 धावांची, तर श्रेयस अय्यरच्या साथीनं 113 धावांची भागीदारी रचली. शिखर धवननं नऊ चौकारांसह 68 धावांची, तर श्रेयस अय्यरनं नऊ चौकार आणि दोन षटकारांसह 88 धावांची खेळी केली.