मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियानं वेस्ट इंडिजचा अख्खा डाव 153 धावांत गुंडाळून, चौथ्या वन डेत 224 धावांनी विजय साजरा केला. भारतानं या विजयासह पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.


या सामन्यात टीम इंडियानं विंडीजला विजयासाठी 378 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. मात्र भारताच्या प्रभावी, आक्रमण गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणासमोर विंडीजला ते आव्हान पेलवलं नाही. त्यांचा अख्खा डाव धावांत गडगडला.


भारताकडून खलिल अहमद आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तर भुवनेश्वर कुमार आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


त्याआधी टीम इंडियानं सामन्यात 50 षटकांत पाच बाद ३७७ धावांचा डोंगर उभारला. सलामीचा रोहित शर्मा आणि अंबाती रायडू यांनी शतकं झळकावून भारतीय डावाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावली. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 211 धावांची भागीदारी रचली.


रोहित शर्मानं 137 चेंडूत 162 धावांची खेळी उभारली. त्याच्या शतकाला 20 चौकार आणि चार षटकारांचा साज होता. रोहितचं वन डे कारकीर्दीतलं हे 21 वं शतक ठरलं. अंबाती रायुडूनं कारकीर्दीतलं तिसरं शतक झळकावलं. त्यानं 81 चेंडूत आठ चौकार चार आणि षटकारांसह 100 धावांचं योगदान दिलं.