India Win Thomas Cup 2022 : बॅडमिंटन विश्वातील एक मानाची आणि अत्यंत जुनी अशी स्पर्धा असणाऱ्या थॉमस कपमध्ये (Thomas Cup) भारतानं इंडोनेशिया संघाला मात देत विजयश्री मिळवला आहे. भारताने मिळवलेल्या या विजयानंतर सर्वच स्तरातून भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.


संपूर्ण देशाला तुमचा अभिमान


भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांनीही भारतीय बॅडमिंटन संघाचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बीसीसीआयने बॅडमिंटन इंडिया असोसिएशनचं ट्वीट शेअर करत भारतीय बॅडमिंटन संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ही एक ऐतिहासिक कामगिरी असून संपूर्ण देशाला तुमचा अभिमान वाटत आहे, असं कॅप्शन बीसीसीआयने दिले आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू इत्यांदीनी देखील भारतीय बॅडमिंटन संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.


 




भारताचा पहिला वहिला विजय


आतापर्यंत सर्वाधिक 14 वेळा इंडोनेशियाने, 10 वेळा चीनने, मलेशियाने 5 वेळा तर जपान आणि डेन्मार्क यांनी एक-एक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ज्यानंतर यंदा 2022 साली भारताने या स्पर्धेत चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत पहिलं वहिला चषक मिळवला आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणार भारत जगातील सहावा देश बनला आहे. यंदा भारतीय बॅडमिंटन संघाने सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी सुरु ठेवली. त्यांनी आधी डेन्मार्कला सेमीफायनलमध्ये मात दिल्यानंतर अंतिम सामन्यात इंडोनेशियाला सुरुवातीच्या तीन सामन्यात मात दिली.


यावेळी सर्वात आधी स्पर्धेतील पहिला सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने (Lakshya Sen) जिंकला. त्याने इंडोनेशियाच्या अँथॉनी गिंटिंगचा 8-21, 21-17 आणि 21-16 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने इंडोनेशियाच्या मुहम्मद एहसान आणि केविन संजया यांना 18-21, 23-21, 21-19, अशा फरकाने मात दिली. ज्यानंतर तिसऱ्या सामन्यात किंदम्बी श्रीकांतने (kidambi srikanth) इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीला 21-15, 22-21 च्या फरकाने मात देत सामना आणि कप भारताच्या नावे केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या