भारताने ऑस्ट्रेलियाच्या सलग 8 द्विपक्षीय वन डे मालिका जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली. 2009-10 साली ऑस्ट्रेलियाने हा विक्रम केला होता. सर्वाधिक सलग वन डे मालिका जिंकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. विंडिजने 1980 ते 1988 या काळात सलग 15 द्विपक्षीय मालिका जिंकल्या होत्या.
भारताच्या विजयाची ही मालिका 2016 साली झिम्बाम्ब्वेविरुद्धच्या वन डे मालिकेपासून सुरु झाली होती. त्यानंतर भारताने न्यूझीलंड (2016), इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड (2017) आणि पुन्हा एकदा श्रीलंकेवर मात करत हा विक्रम केला.
शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने रचलेल्या शतकी भागिदारीच्या जोरावर टीम इंडियाने विशाखापट्टणमच्या वन डेत श्रीलंकेचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. यामध्ये धवनच्या नाबाद 100 धावांचा समावेश होता. भारताने या विजयासह तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.
भारतीय संघाने जिंकलेली ही वन डे सामन्यांची आठवी मालिका ठरली. या सामन्यात कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. हार्दिक पंड्याने दोन विकेट्स काढून त्यांना साथ दिली. त्यामुळे श्रीलंकेचा 3 बाद 160 धावांवरून 215 धावांत खुर्दा उडाला.
त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. पण धवन आणि श्रेयसने 135 धावांची भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार दिला. श्रेयसने 63 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह 65 धावांची खेळी उभारली.
श्रीलंकेविरुद्धचा हा विक्रम गेल्या 35 वर्षांपासून कायम
- 1982-83 साली तीन वन डे सामन्यांची मालिका भारताने 3-0 ने जिंकली
- 1986-87 साली पाच वन डे सामन्यांची मालिका भारताने 5-0 ने जिंकली
- 1990-91 साली चार वन डे सामन्यांची मालिका भारताने 4-1 ने जिंकली
- 1993-94 साली तीन वन डे सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली
- 1997-98 साली तीन वन डे सामन्यांची मालिका 1-1 ने अनिर्णित
- 2005-06 साली सात वन डे सामन्यांची मालिका भारताने 6-1 ने जिंकली
- 2006-07 साली चार वन डे सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली
- 2009-10 साली पाच वन डे सामन्यांची मालिका भारताने 3-1 ने जिंकली
- 2014-15 साली पाच वन डे सामन्यांची मालिका भारताने 5-0 ने जिंकली
- 2017-18 मध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका भारताने 3-1 ने जिंकली