कोलकाता : दिनेश कार्तिकच्या झुंजार फलंदाजीनं टीम इंडियाला कोलकात्याच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात पाच विकेट्सनी चुरशीचा विजय मिळवून दिला. भारतीय संघानं या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.


या सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी 110 धावांचं माफक लक्ष्य होतं. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची चार बाद 45 अशी घसरगुंडी उडाली होती. त्या परिस्थितीत दिनेश कार्तिकनं आधी मनीष पांडे आणि कृणाल पंड्याच्या साथीनं छोट्या छोट्या, पण मोलाच्या भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.


कार्तिकनं नाबाद 31 धावांची खेळी करून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. मनीष पांडेनं 19, तर कृणाल पंड्यानं नाबाद 21 धावा फटकावल्या.


त्याआधी, भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर वेस्ट इंडिजची 20 षटकांत आठ बाद 109 अशी घसरगुंडी उडाली. विंडीजच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर फार वेळ तग धरता आला नाही. भारताच्या चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं सर्वाधिक तीन फलंदाजांना माघारी धाडलं.


उमेश यादव, खलिल अहमद, कृणाल पंड्या आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी एक विकेट घेतली. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फॅबियन अॅलननं विंडीजकडून सर्वाधिक 27 धावांचं योगदान दिलं.