India vs China Hockey Champions Trophy Final : भारताने अंतिम फेरीत चीनचा 1-0 असा पराभव करून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. पहिले तीन क्वार्टरमध्ये एक पण गोल झाला नव्हता, पण अखेर टीम इंडियाने चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये शानदार गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली, जी शेवटपर्यंत कायम राहिली. भारताच्या जुगराजने सामन्यातील एकमेव गोल केला. इतिहासात भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे.
सामन्याच्या सुरुवातीलाच चीन खुप आक्रमक खेळत होता, पण पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र दोन्ही वेळा चीनच्या गोलरक्षकाने आपला गोलपोस्ट सुरक्षित ठेवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांनी गोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण सामन्यातील एकमेव गोल 51 व्या मिनिटाला झाला, जिथे भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने जुगराजला पास दिला आणि त्याने चेंडू गोलपोस्टमध्ये मारून शानदार गोल केला.
या विजयासह भारताने सुवर्णपदक तर चीनने रौप्यपदक पटकावले आहे. तर तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण कोरियाचा 5-2 असा पराभव केला होता. शेवटच्या क्षणांमध्ये चीनच्या खेळाडूंनी चेंडूवर बराच वेळ ताबा ठेवला, पण भारताचा बचावही उत्कृष्ट होता. याआधी, भारत आणि चीन स्पर्धेच्या गट टप्प्यात आमनेसामने आले होते, जिथे टीम इंडियाने 3-0 असा सहज विजय नोंदवला होता.
भारताने विजेतेपद कधी जिंकले?
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2011 मध्ये सुरू झाली, जिथे भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 ने पराभूत करून विजेतेपद पटकावले. त्यानंतर 2016 मध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा 3-2 असा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. 2018 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. 2023 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा 4-3 असा पराभव करून चौथ्यांदा ही ट्रॉफी जिंकली होती.
हे ही वाचा -
चेहऱ्यावर मास्क, हातात चीनचा झेंडा; भारताविरुद्ध चीनला पाठिंबा, पाकिस्तानी हॉकी संघाचा फोटो व्हायरल