राजकोट : वेस्टइंडिज विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने वेस्टइंडिजला 272 धावा आणि एका डावाने धुळ चारली. कसोटी सामन्यामध्ये भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी भारतानं यावर्षी जून महिन्यात अफगाणिस्तानचा एक डाव आणि 262 धावांनी पराभव केला होता.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 18 वर्षीय पृथ्वी शॉने दमदार प्रदर्शनाने सर्वांची मनं जिंकली. पृथ्वीने पहिल्याच सामन्यात 134 धावा धावांची शतकी खेळी केली. याच खेळीच्या जोरावर पृथ्वी या सामन्यात सामनावीर ठरला. पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरणारा पृथ्वी भारताचा सहावा खेळाडू ठरला आहे.
याशिवाय 18 वर्ष 329 दिवसांचा पृथ्वी पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरलेला भारताचा तिसरा युवा खेळाडू आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारताकडून सर्वात कमी वयात म्हणजे 17व्या वर्षी सामनावीर ठरला होता.
भारताकडून प्रविण आमरेने 1992 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला होता. त्यावेळी आमरेंनी 103 धावांची खेळी केली होती. आमरेनंतर जलद गोलंदाज आरपी सिंहने 2006मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच सामन्यात पाच विकेट घेत सामनावीर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं.
आरपी सिंहनंतर रविचंद्रन अश्विनने 2011मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्याच सामन्यात 6 विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात अश्विन सामनावीर ठरला होता. भारताचा सलामीवर शिखर धवनही पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरला होता. शिखरने 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 187 धावांची खेळी केली होती.
भारताचा सध्याचा स्फोटक खेळाडू रोहित शर्माचा सध्या कसोटी संघात समावेश नाही, मात्र रोहितची सुरुवातही धमाकेदार होती. रोहितने सचिनच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरोधात 177 धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे रोहितला पहिल्याच सामन्यात सामनावीर म्हणून निवडण्यात आलं होतं.