मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. गुवाहाटीत बारसापरा क्रिकेट स्टेडियमवर खेळवल्या जात असलेल्या पहिली वन डेमध्ये टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
विराट कोहलीच्या टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. आणि आता विराटसेना सज्ज झाली आहे ती विंडीजविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी. या मालिकेच्या निमित्ताने विराटसेनेचा सामना जेसन होल्डरच्या कॅरेबियन फौजेशी होत असला तरी टीम इंडियाला वेध लागले आहेत इंग्लंडमधल्या आगामी विश्वचषकाचे.
आयसीसीच्या वन डे सामन्यांच्या क्रमवारीत टीम इंडिया सध्या दुसऱ्या स्थानावर आहे, तर वेस्ट इंडिज चक्क नवव्या स्थानावर. आयसीसी क्रमवारीतली ही तफावत लक्षात घेता, टीम इंडियाला वन डे सामन्यांच्या मालिकेवर वर्चस्व गाजवणं सोपं ठरेल असं दिसतं.
इंग्लंडमध्ये 2019 सालच्या वन डे विश्वचषकाला आता अवघ्या आठ महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे आगामी वन डे सामन्यांमधल्या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआयच्या निवड समितीचं बारीक लक्ष राहील. टीम इंडियाचा चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा शोध अजूनही पूर्ण झालेला नाही. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाज म्हणून सातत्याने अपयशी कामगिरीमुळे टीम इंडियाची मधल्या फळीची चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे आगामी मालिकेत चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी नियमित फलंदाज शोधणं हे भारतीय संघ व्यवस्थापनासमोरचं मोठं आव्हान असेल.
कर्णधार विराट कोहलीच्या मते अंबाती रायुडू हा चौथ्या क्रमांवर आपली भूमिका योग्यरित्या बजावू शकतो. विराटच्या अनुपस्थितीत त्यानेच आशिया चषकात लक्षवेधक कामगिरी बजावली होती. अंबाती रायुडूनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सहा सामन्यांत 43.75 च्या सरासरीने 175 धावा फटकावल्या होत्या. त्यात दोन अर्धशतकांचाही समावेश होता.
पर्यायी यष्टिरक्षक रिषभ पंतचं पदार्पण हेही भारत-विंडीज संघांमधल्या पहिल्या वन डेचं आकर्षण ठरावं. टीम इंडियानं सलामीच्या वन डेसाठी जाहीर केलेल्या बारासदस्यीय संघात त्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे महेंद्रसिंग धोनी यष्टिरक्षक या नात्यानं मैदानात असताना, रिषभ पंत हा निव्वळ फलंदाज म्हणून संघात येईल. आशिया चषकात अयशस्वी ठरलेल्या दिनेश कार्तिकऐवजी त्याला पदार्पणाची संधी देण्यात येईल.
भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत भारताच्या वेगवान आक्रमणाचा भार प्रामुख्याने उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांच्यावर राहील. फिरकीचा भार सांभाळण्यासाठी कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल आणि रवींद्र जाडेजा ही त्रिमूर्ती सज्ज झाली आहे.
टीम इंडियाची सध्याची कामगिरी लक्षात घेता विंडीजचा पेपर तुलनेत सोपा ठरावा. पण विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून टीम कॉम्बिनेशनचे प्रयोगही यशस्वी ठरावेत हाही भारताचा प्रयत्न राहील.