विशाखापट्टणम : शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने रचलेल्या शतकी भागिदारीच्या जोरावर टीम इंडियाने विशाखापट्टणमच्या वन डेत श्रीलंकेचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. यामध्ये धवनच्या नाबाद 100 धावांचा समावेश होता. भारताने या विजयासह तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.

भारतीय संघाने जिंकलेली ही वन डे सामन्यांची आठवी मालिका ठरली. या सामन्यात कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. हार्दिक पंड्याने दोन विकेट्स काढून त्यांना साथ दिली. त्यामुळे श्रीलंकेचा 3 बाद 160 धावांवरून 215 धावांत खुर्दा उडाला.

त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. पण धवन आणि श्रेयसने 135 धावांची भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार दिला. श्रेयसने 63 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह 65 धावांची खेळी उभारली.

रोहित शर्माचे हे तीन मोठे विक्रम हुकले!

मोहाली वन डेतील खेळीप्रमाणेच विशाखापट्टणममध्येही रोहित शर्माची खेळी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तो केवळ सात धावांवर बाद झाला, ज्यामध्ये एका षटाकाराचाही समावेश होता.

मोठी खेळी, सोबतच तीन मोठे विक्रम नावावर करण्याची रोहित शर्माकडे संधी होती. मात्र तो बाद होताच चाहत्यांची सपशेल निराशा झाली. मोहाली वन डेत रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध कारकीर्दीतलं तिसरं द्विशतक ठोकलं होतं.

50 षटकार पूर्ण करण्याची संधी हुकली

रोहित शर्माने 2017 या वर्षात खेळलेल्या 21 सामन्यांमध्ये 46 षटकार ठोकले आहेत. त्याने आणखी 4 षटकार ठोकताच एक मोठा विक्रम नावावर झाला असता. भारतीय वन डे क्रिकेटच्या इतिहासात एका वर्षात आतापर्यंत कुणीही 50 षटकार पूर्ण केलेले नाहीत. एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर आहे, ज्याने 2015 या वर्षामध्ये 58 षटकार पूर्ण केले होते.

डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी राहिली

गेल्या दोन वर्षात सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूची बरोबरी करण्याची रोहित शर्माला संधी होती. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने 2015 पासून आतापर्यंत 12 शतकं ठोकली आहेत, तर रोहित शर्माच्या नावावर 11 शतकं आहेत. एक शतक ठोकताच त्याने या विक्रमाची बरोबरी केली असती. दरम्यान, विराट कोहलीच्या नावावरही 2015 पासून आतापर्यंत 11 शतकं आहेत.