वसई : नालासोपाऱ्यात दोन तरुणांचा एटीएम लुटीचा प्रयत्न फसला आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आल्यानं दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. आज रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवनजवळील शर्मावाडी येथे टाटा इंडीकॅश हे एटीएम मशिन आहे. आज रविवारी पहाटे तीनच्या सुमारास दोन व्यक्तींनी तोडांवर रुमाल बांधून एटीएममध्ये प्रवेश केला आणि एटीएम मशीन लोखंडी हत्यारांच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पेट्रोलिंगला असलेल्या पोलिसांनी एटीएममध्ये संशयास्पद हालचाली पाहून एटीएममध्ये प्रवेश केला.

घटनास्थळावरुन पोलिसांनी एकाला अटक केली, मात्र दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र त्याचाही पाठलाग करुन पोलिसांनी त्याला जेरबंद केलं. या दोघांचीही कसून चौकशी सुरु आहे. तसंच त्यांच्यामागे लूट करणारी आणखी टोळी आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.