कोलंबो : कोलंबोतील टी-20 सामन्यात टीम इंडियानं श्रीलंकेचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला. श्रीलंकेनं दिलेल्या 171 धावांचं आव्हानं भारतानं 19.2 षटकांत 3 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.


विराट कोहलीनं कर्णधाराला साजेशी खेळी करत 54 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारांसह 82 धावा फटकावल्या. तर मनिष पांडेनं 36 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 51 धावांची खेळी केली.

सलामीवीर रोहित शर्मा मलिंगाच्या गोलंदाजीवर स्वस्तात बाद झाला तर लोकेश राहुलनं 24 धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतं मनिष पांडेसोबत तिसऱ्या विकेटसाठी 119 धावांची भागिदारी साकारली. 82 धावांच्या दमदार खेळीच्या जोरावरच मालिकावीर आणि सामनावीराचा पुरस्कार विराट कोहलीनं पटकावला.

दरम्यान, नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना श्रीलंकेनं निर्धारीत 20 षटकात 7 बाद 170 धावा केल्या. श्रीलंकेच्या दिलशान मुनावीरानं तुफान फटकेबाजी करताना केवळ 29 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 53 धावा फटकावल्या. तर अशन प्रियंजननं नाबाद 40 धावांची खेळी केली. मात्र, श्रीलंकेच्या इतर फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.

भारताकडून यजुवेंद्र चहलनं 43 धावांत सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. कुलदीप यादवनंही प्रभावी मारा करत 4 षटकात केवळ 20 धावा देत 2 फलंदाजांना माघारी धाडलं. तर भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी एक विकेट घेतली.