कोलंबो : टीम इंडियाच्या विजयाचा वारु असा काही उधळला आहे की श्रीलंकेला त्याला रोखणं अशक्य झालं आहे. कसोटी आणि वन डे मालिकेतल्या धडाकेबाज कामगिरीनंतर आता विराटसेना सज्ज झाली आहे ती श्रीलंकेविरूद्धच्या एकमेव टी-20 सामन्यासाठी.
आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत टीम इंडिया पाचव्या स्थानावर तर श्रीलंका आठव्या स्थानावर आहे. त्यामुळं इथंही भारताचंच पारडं जड असल्याचं दिसून येतं. भारत आणि श्रीलंकादरम्यानच्या मागील दहा टी-20 सामन्यांमध्ये भारतानं सहा तर श्रीलंकेनं चार सामने जिंकले आहेत. कोलंबोतल्या टी-20 सामन्यात तेच वर्चस्व कायम राखून श्रीलंका दौऱ्यात अपराजित राहण्याचं भारतीय संघाचं लक्ष्य असेल.
नुकत्याच झालेल्या वन डे मालिकेत विराट आणि त्याच्या शिलेदारांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात सरस कामगिरी बजावली होती. शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांनी या मालिकेत धावांचा रतीब घातला. टीम इंडियाच्या विजयात गोलंदाजांनीही तेवढीच मोलाची भूमिका बजावली. जसप्रीत बुमरानं सर्वाधिक 15 विकेट्स घेत मालिकावीराचा बहुमान पटकावला. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार, केदार जाधव, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवनंही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. टीम इंडियाच्या याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आता सामन्यातही केली जात आहे.
शिखर धवन मायदेशी परतल्यानं रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल आणि महेंद्रसिंग धोनी या शिलेदारांवरच प्रामुख्यानं भारताच्या फलंदाजीची भिस्त राहील. त्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. टीम इंडियाचे हे कर्णधार आणि उपकर्णधार भारतीय डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे.
वन डे मालिकेत कोहलीनं 5 सामन्यांत दोन शतकांसह सर्वाधिक 330 धावा कुटल्या आहेत, तर रोहितनंही दोन शतकांसह 5 सामन्यांत 302 धावा फटकावल्या होत्या. भारतीय फलंदाजांनी हाच फॉर्म कायम राखल्यास, एकमेव टी-20 सामन्यातही विजय मिळवणं टीम इंडियाला कठीण जाणार नाही. अर्थात श्रीलंका संघही दोन्ही मालिकांमधल्या निराशाजनक कामगिरीनंतर हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. परंतु विराट आणि त्याच्या शिलेदारांची ताजी कामगिरी पाहता टीम इंडियाला हरवणं श्रीलंकेसाठी तेवढं सोपं नाही.
भारतात होणाऱ्या आगामी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकांच्या दृष्टीनं भारत-श्रीलंका सामना महत्वाचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर विराटची टीम इंडिया कोलंबोच्या टी-20 सामन्यात कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव टी-20साठी टीम इंडिया सज्ज
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
05 Sep 2017 09:26 PM (IST)
कसोटी आणि वन डे मालिकेतल्या धडाकेबाज कामगिरीनंतर आता विराटसेना सज्ज झाली आहे ती श्रीलंकेविरूद्धच्या एकमेव टी-20 सामन्यासाठी.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -