गॉल : सलामीचा अभिनव मुकुंद आणि कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 133 धावांच्या भागीदारीने श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीची सूत्रं टीम इंडियाच्या हाती आणून दिली आहेत.


पहिल्या डावातील शतकवीर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा दुसऱ्या डावात स्वस्तात माघारी परतले. पण मुकुंद आणि विराटच्या जबाबदार फलंदाजीने भारताला तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 189 धावांची मजल मारुन दिली. पहिल्या डावातली 309 धावांची आघाडी जमेस धरता टीम इंडियाची एकूण आघाडी 498 धावांची झाली आहे.

अभिनव मुकुंदने आठ चौकारांसह 81 धावांची खेळी उभारली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी विराट कोहली 76 धावांवर खेळत होता. विराटच्या या खेळीला पाच चौकारांचा साज आहे.

दरम्यान, त्याआधी भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला अवघ्या 291 धावांत गुंडाळून पहिल्या डावात तब्बल 309 धावांची आघाडी घेतली. पण एवढ्या मोठ्या आघाडीनंतरही भारताचा कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेवर फॉलोऑन न लादण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या दिलरुवान परेरानेही नाबाद 92 धावांची झुंजार खेळी केली. पण भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या डावात मोठ्या भागीदारी होऊ दिल्या नाहीत. त्यामुळे श्रीलंकेचा डाव 291 धावांत आटोपला.

भारताकडून रवींद्र जाडेजानं 67 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमीने दोन, तर उमेश यादव, रवीचंद्रन अश्विन आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी एक विकेट घेतली.

या कसोटीत अजूनही दोन दिवसांचा खेळ शिल्लक असून, टीम इंडियाला गॉल कसोटी जिंकण्याची उत्तम संधी आहे.