मुंबई: राज्याच्या विधानसभेत आज पुन्हा एकदा ‘वंदे मातरम’वरुन खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप आमदार अनिल गोटे यांनी या देशात राहणाऱ्यांना वंदे मातरम म्हणावंच लागेल, असं म्हणाले.


त्यानंतर अबू आझमी यांनी इतिहासाचा दाखला देत, वंदे मातरम हे इस्लामच्या विरोधात असल्याचं नमूद केलं. तसंच देशासाठी अनेक मुस्लिमांनी बलिदान दिलं, शिवाजी महाराजांचे अनेक सरदार मुस्लिम होते, त्यांचे वकील मुस्लिम होते, त्यामुळे आम्ही देशविरोधी आहोत असं पसरवू नका. सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा, हिंदुस्थान झिंदाबादचा नारा आम्ही एकवेळ नाही तर हजारवेळा देऊ, पण वंदे मातरम म्हणणार नाही, असं अबू आझमी म्हणाले.

अबू आझमींच्या या पवित्र्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सूत्रं हातात घेतली. खडसे यांनी अबू आझमींना हिंदीतूनच उत्तर दिलं.

खडसे म्हणाले, “स्वातंत्र्याचं संपूर्ण युद्ध वंदे मातरम गातच लढलं गेलं, तर तुम्हाला आक्षेप का? वंदे मातरम चुकीचं काय? ‘माँ तुझे सलाम’… जिथे आम्ही जन्मला, इथलं अन्न-पाणी घेता, मृत्यूनंतर जमीन, कफन इथलीच असेल. जिथे तुम्ही वाढला, लहानाचं मोठं झाला, मृत्यूनंतरही याच मातीत अत्यंसंस्कार होणार असतील, तर त्या मातीला नमन करण्यास अडचण काय?

वंदे मातरम गाऊ नका, हे कोणत्या धर्मात लिहिलं आहे, हे मला दाखवा. याचा अर्थ माँ तुझे सलाम, मातृभूमीला सलाम असा आहे. इथली हवा, पाणी इथलं, कपड्यापासून मातीपर्यंत सगळं इथलं घ्यायचं असेल, तर वंदे मातरम म्हणावंच लागेल. इस देश में रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा”