कॅण्डी: तळाचा फलंदाज भुवनेश्वर कुमारची टिच्चून फलंदाजी आणि संकटमोचक महेंद्रसिंह धोनीच्या मॅच्युअर इनिंगमुळे टीम इंडियाने, श्रीलंकेचा दुसऱ्या वनडेतही पराभव केला.


महेंद्रसिंग धोनी आणि भुवनेश्वर कुमारनं आठव्या विकेटसाठी रचलेल्या अभेद्य शतकी भागिदारीनं टीम इंडियासमोरचं पराभवाचं विघ्न दूर झालं. भारतानं कॅण्डीच्या दुसऱ्या वन डेत श्रीलंकेवर तीन विकेट्सनी सनसनाटी विजय साजरा केला.

भुवनेश्वर कुमारने 80 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 53 धावा केल्या. तर धोनीने 68 चेंडूत नाबाद 45 धावा कुटल्या.

या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळं टीम इंडियासमोर विजयासाठी 47 षटकांत 231 धावांचं लक्ष्य होतं. पण श्रीलंकेच्या अकिला धनंजयनं सहा विकेट्स काढून भारताची सात बाद 131 अशी केविलवाणी अवस्था करून ठेवली होती.

त्या परिस्थितीत धोनी आणि भुवनेश्वर कुमारनं आठव्या विकेटसाठी 100 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

पावसामुळे सुधारित 231 धावांचं लक्ष्य घेऊन टीम इंडियाचे सलामीवीर मैदानात उतरले. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी वेगवान सुरुवात करुन, 15. 3 षटकात 109 धावा फटकावल्या.

रोहित शर्मा 54 धावा करुन माघारी परतला. मात्र त्यानंतर टीम इंडियाला गळती सुरु झाली. अकिला धनंजयने अवघ्या 22 धावात टीम इंडियाचे 6 फलंदाज तंबूत धाडले.

रोहित शर्मापाठोपाठ लगेचच शिखर धवनला सिरीवर्धनेने माघारी धाडलं. धवन अर्धशतकापासून 1 धाव दूर राहिला.

यानंतर मग धनंजयने 17 व्या षटकात केदार जाधव (1), विराट कोहली (4) आणि के एल राहुलला (4) माघारी धाडून, टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं.

धनंजयचा कहर इथेच थांबला नव्हता, मग त्याने पुढच्याच म्हणजे 19 व्या षटकात हार्दिक पांड्याला शून्यावर, तर 22 व्या षटकात अक्षर पटेलला 6 धावांवर माघारी धाडलं. त्यावेळी टीम इंडियाची अवस्था 7 बाद 131 अशी होती.

त्यावेळी महेंद्रसिंह धोनीच्या साथीला भुवनेश्वर कुमार आला. जोपर्यंत धोनी आहे, तोपर्यंत मॅच आहे, अशीच धारणा प्रत्येकाची होती. मात्र नॉन स्ट्रायकरला उभ्या असलेला भुवनेश्वर धोनीला कितपत साथ देतो, याबाबत अनेकांना साशंकता होती.

भुवनेश्वरने सगळ्या शक्यतांना तिलांजली देत, तो एखाद्या हुकमी फलंदाजासारखा मैदानात उभा राहिला. मलिंगाने त्याला कधी यॉर्कर तर कधी छातीपेक्षा वर जाणारे बाऊन्सर मारले, मात्र तरीही भुवनेश्वर बिचकला नाही.

त्याने धोनीला हिमतीने साथ दिली. एकवेळ भुवनेश्वरची फलंदाजी पाहून, तो एकटाच भारताला मॅच जिंकून देणार असं वाटत होतं, ते त्याने खरं करुन दाखवलं. भुवनेश्वरने 77 चेंडूत त्याचं अर्धशतकही पूर्ण केलं.

भुवनेश्वरने धोनीच्या साथीने 135 चेंडूत 100 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

त्याआधी, जसप्रीत बुमरा आणि यजुवेंद्र चहल यांच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं श्रीलंकेला 50 षटकांत आठ बाद 236 धावांत रोखलं होतं. जसप्रीत बुमरानं 43 धावांच्या मोबदल्यात चार फलंदाजांना माघारी धाडलं. यजुवेंद्र चहलनं 43 धावांत दोन फलंदाजांचा काटा काढला. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलनं एकेक विकेट घेतली.