दिल्ली कसोटी अनिर्णित, लंकेचा संघर्ष यशस्वी; 1-0नं मालिका भारताच्या खिशात
एबीपी माझा वेब टीम | 06 Dec 2017 12:54 PM (IST)
श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात शतक झळकावणारा धनंजय डिसिल्व्हा दुखापत झाल्यानं ड्रेसिंगरुममध्ये परतला आहे.
नवी दिल्ली : दिल्ली कसोटी वाचवण्यासाठीचा श्रीलंकेच्या फलंदाजांचा संघर्ष अखेर यशस्वी ठरला आहे. या कसोटीत चौथ्या डावात शंभरहून अधिक षटकं टाकूनही भारतीय गोलंदाजांना श्रीलंकेला गुंडाळण्यात अपयश आलं. त्यामुळं भारत आणि श्रीलंका संघांमधली तिसरी कसोटी अनिर्णीत राहिली. भारतीय क्षेत्ररक्षकांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना पहिल्या डावात दिलेल्या चार आणि दुसऱ्या डावात दिलेल्या दोन जीवदानांनी ही कसोटी ड्रॉच्या दिशेनं गेली. श्रीलंकेचा शतकवीर धनंजय डिसिल्व्हासह दिनेश चंडिमल, रोशन सिल्व्हा आणि निरोशन डिकवेला यांच्या झुंजार फलंदाजीनं ही कसोटी अनिर्णीत राखली. मात्र, टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीतल्या विजयासह तीन कसोटी सामन्यांची ही मालिका १-० अशी खिशात टाकली. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताचा हा सलग नववा कसोटी मालिका विजय ठरला आहे. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा आणखी एक विक्रम टीम इंडियानं नऊपैकी नऊ कसोटी मालिका विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत, हे विशेष. भारतीय संघानं ही कामगिरी बजावून सलग कसोटी मालिका विजयांच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी केली. टीम इंडियानं २०१५ सालच्या सप्टेंबरपासून आजवर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. भारतानं २०१५ साली श्रीलंकेला श्रीलंकेत आणि दक्षिण आफ्रिकेला भारतात धूळ चारली होती. मग २०१६ साली टीम इंडियानं वेस्ट इंडिजला विंडीजमध्ये तर न्यूझीलंड आणि इंग्लंडला भारतात हरवण्याची किमया केली होती. यंदा बांगलादेशाला आणि ऑस्ट्रेलियाला भारतात, तर श्रीलंकेला आधी श्रीलंकेत आणि मग मायदेशात हरवून टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.