कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत टीम इंडियानं आपला पहिला डाव 9 बाद 622 धावांवर घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने दोन गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा केल्या. त्यामुळे या सामन्यावर टीम इंडियानं मजबूत पकड मिळवली आहे.
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या शतकी खेळी आणि अश्विन, जाडेजाच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारतानं मोठी मजल मारली आहे. पुजारा 133 आणि अजिंक्य रहाणे 132 धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेल्या अश्विन आणि साहा आणि जाडेजानं अर्धशतकं झळकावत टीम इंडियाला 600 धावांचा टप्पा पार करुन दिला. श्रीलंकेकडून रंगाना हेराथनं 4 बळी घेतले. मात्र, इतर कोणत्याही गोलंदाजाला फारशी चमक दाखवता आली नाही.
तर श्रीलंकेच्या पहिल्या डावाची सुरुवातही अडखळतीच झाली. थरंगा आणि करुणारत्ने या दोघांनाही अश्विननं झटपट बाद केलं. त्यानंतर आलेल्या मेंडिस आणि चंदिमलनं फार पडझड होऊ दिली नाही.
दरम्यान, आज सकाळी पुजारा आणि अजिंक्य रहाणेनेनं कालच्या 3 बाद 344 धावांवरुन भारताच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती. मात्र, पुजारा आपल्या कालच्या 128 धावांमध्ये 5 धावांची भर घालून माघारी परतला. पुजारा – रहाणेने चौथ्या विकेटसाठी 217 धावांची भागीदारी केली.