मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघरमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
अरबी समुद्राच्या मध्य-पूर्व आणि ईशान्य भागात दक्षिण गुजरात आणि उत्तर कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील सर्व शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना शिक्षणमंत्र्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. आपल्या परिसरातील परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याच्या सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहे.
बुधवारी रात्री पावसाने विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली होती. जोरदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं. मात्र रात्रीपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबई शहरात 20 मिमी, पश्चिम उपनगरात 40 मिमी तर पूर्व उपनगरात 51 मिमी पावसाची नोंद काल रात्रीपासून झाली आहे.