नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झालेल्या विकेटकीपर रिद्धीमान साहाला, आता मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी भारतीय संघात साहाऐवजी दिनेश कार्तिकचा समावेश करण्यात आला आहे.

दुसऱ्या कसोटीपूर्वी रिद्धीमान साहाला सरावादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत साहाऐवजी पार्थिव पटेलला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं.

साहाची दुखापत बरी न झाल्याने त्याला तिसऱ्या कसोटीतूनही माघारी घ्यावी लागली आहे. त्यामुळे त्याच्या जागी दिनेश कार्तिकचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.



आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना 24 जानेवारीपासून जोहान्सबर्गमध्ये सुरु होणार आहे.

32 वर्षीय दिनेश कार्तिक भारताकडून 23 कसोटी सामने खेळला आहे. तो शेवटचा कसोटी सामना 2010 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत खेळला होता. विकेटकीपर म्हणून त्याने 51 झेल आणि 5 स्टम्पिंग केले आहेत.

दुसरीकडे रिद्धीमान साहा सध्या भारताच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग आहे. साहाने सातत्याने कसोटीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने एकाच कसोटीत 10 झेल पकडून भारतीय क्रिकेट इतिहासात नवा विक्रम रचला आहे.

साहाने 2010 मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं. आतापर्यंत तो 32 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 75 झेल आणि 10 स्टम्पिंग केले आहेत.