सेंच्युरियन: केपटाऊन पाठोपाठ सेंच्युरियन कसोटीतही भारतीय संघावर पराभवाची टांगती तलवार आहे. 287 धावांचा पाठलाग करताना, चौथ्या दिवसअखेर भारताच्या 3 बाद 35 धावा झाल्या आहेत.


आज पाचव्या दिवशी भारतीय संघासमोर सामना वाचवण्याचं आव्हान आहे.

कर्णधार कोहली काल बाद झाला, त्यावर भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने तातडीने प्रतिक्रिया व्यक्त केली. कैफने ट्विट करुन “आता सर्व संपलं, कोहली गेला, भारतही गेला” असं म्हटलं.


वीरेंद्र सेहवागला लगानची आठवण

भारताची बिकट अवस्था पाहून माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने मार्मिक ट्विट केलं. सेहवागने आमीर खानच्या लगान सिनेमाची GIF ट्विट केली, ज्यामध्ये आमीर पावसाची आस धरत आहे.



म्हणजेच भारताला आता पावसाचीच आशा आहे.

सेंच्युरियन कसोटीची सद्यस्थिती

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 335 धावांवर आटोपला.

तर भारताने पहिल्या डावात 307 धावा केल्या. त्यामुळे आफ्रिकेला पहिल्या डावात 28 धावांची आघाडी मिळाली.

दुसऱ्या डावात भारताने आफ्रिकेला 258 धावांतच रोखलं. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडी पाहता भारतासमोर विजयासाठी 287 धावांची गरज आहे.

या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसअखेर 3 बाद 35 धावा केल्या. सलामीवीर मुरली विजय (9), के एल राहुल 4 आणि विराट कोहली 5 धावा करुन माघारी परतले आहेत.

सध्या भरवशाचा चेतेश्वर पुजारा 11 आणि पार्थिव पटेल 5 धावा करुन मैदानात आहे. भारताला या जोडीकडून तसंच रोहित शर्माकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

संबंधित बातम्या

दुसऱ्या डावात टीम इंडियाची घसरगुंडी, विजयासाठी २८७ धावांचं आव्हान 

पंचांशी हुज्जत महागात, विराटवर दंडाची कारवाई